Corona Impact : मनोरंजन क्षेत्रातही उदासीनता, पुण्याचे विस्कटलेले अर्थकारण भाग – 7

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  (राजेंद्र पंढरपुरे) –  आर्थिक महामंदीच्या फेऱ्यात पुण्यातील मनोरंजन क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित अन्य घटकही भरडले जात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्यावर बंदी घातली त्यालाही आता सव्वाशे दिवस झालेत. याचा दणका बॅकस्टेज आर्टिस्ट (पडद्यामागील कलाकार), प्रयोगाचे ठेकेदार, जाहिरात संस्था, उपहारगृह चालक आणि कर्मचारी, स्वच्छतेचे कंत्राट घेणारे ठेकेदार आणि कर्मचारी, वातानुकुलीत यंत्रणेचे काम करणारे ठेकेदार आणि कर्मचारी, इलेक्ट्रिशिअन, वाहनतळांचे ठेकेदार आणि कर्मचारी, रंगमंदिराच्या आवारात गजरे विकणारी मुलं-मुली, कंत्राटी पद्धतीने नेमलेले रखवालदार, तिकीट विक्री विभाग असा एक मोठा परिवार यावर अवलंबून असतो. यातील बहुतेकजण कंत्राटी पद्धतीनेच एरवीही काम करत असतात. काम केले तरच त्यांना रोजगार मिळतो. आता तर सलग सव्वाशे दिवसांहून अधिक काळ सिनेमागृह, नाट्यगृहे बंदच आहेत त्यामुळे रोजगार नाहीच. उपहारगृहांचे आणि जाहिरात संस्थांचे मालक सोडले तर बाकी सगळे बेताच्याच आर्थिक परिस्थितीतले असतात. यांची कुटुंबेही मोठी असतात. त्यामुळे संसाराचा गाडा ओढणे त्यांना खूप अवघड होत आहे. नाटक कंपनीतील बॅकस्टेज आर्टिस्टना अन्य ठिकाणांहून थोडी तरी मदत मिळाली. पण सिनेमा थिएटर्सवर अवलंबून असणारे जे कामगार बेकार झाले त्यांचा आवाज तर कुठे नोंदविलाही गेला नाही.

बालगंधर्व रंगमंदिरात नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच लोकनाट्य आणि लावण्यांचे कार्यक्रम सादर केले जातात. बालगंधर्व रंगमंदिर तसेच अन्य खाजगी थिएटर्स बंद असल्याने लोकनाट्य, लावणी कलाकारांना व्यावसायिक पद्धतीने कार्यक्रमच सादर करता आलेले नाहीत. संगीतबारी, तमाशा याला हमखास प्रेक्षक मिळत असल्याने पुणे शहरातच काही संस्था स्थापन झाल्या. त्यांनी व्यावसायिक पद्धतीने कार्यक्रम सुरु केले. कलाकारांचा व्यावसायिक संचच तयार असून त्यांना शहरात, ग्रामीण भागात खूप मागणी असते. ते सर्व संचच आता विस्कटून गेले आहेत.

चैत्र महिन्यातले ऊरुस, जत्रा पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतात. त्या जत्रांना जोडूनच लोककलाकारांना कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळते त्यातून उत्पन्न मिळते. यंदा गर्दी टाळण्यासाठी ऊरुस, जत्रा झाल्याच नाहीत. साहजिकच या कलाकारांच्या उत्पन्नावर गदा आली. आगामी गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. गणेशाचे आगमन, विसर्जनाच्या मिरवणुका नसतील तसेच उत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रमही सादर करण्यात येणार नाहीत. त्यामुळे उत्सव काळात कलाकारांना मिळणारे बुकिंंगही मिळाले नाही. त्यामुळे या क्षेत्रातही अस्वस्थता आहे.

याखेरीज इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत. त्यांच्यामध्ये प्रकाशयोजना करणारे, ध्वनी व्यवस्था करणारे, पेंटर, व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग करणारे असे एक मोठे वर्तुळ असते. हे इव्हेंट मॅनेजर्स लक्षावधी रुपयांची उलाढाल करत असतात. लॉकडाऊनमुळे हे मोठे व्यवहारही बंद आहेत.

नाट्य आणि लोकनाट्य या क्षेत्रात पुण्यामध्ये तीन हजार बॅकस्टेज आर्टिस्ट आणि अन्य घटक काम करतात. अशा रितीने किमान दहा हजार कुटुंब थेट मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्या आधाराने ते चरितार्थ चालवतात. आर्थिक तंगीने त्यांना कठीण दिवस आले आहेत.