Corona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन वाढले ! निर्यात आणि हॉटेल बंद राहील्याने मासळी सर्वसामान्यांच्या ‘आवाक्यात’ : विशाल परदेशी

पुणे – लॉकडाऊन आणि त्यापाठोपाठ पावसाळा यामुळे सहा महिने मासेमारी बंद राहिल्याने खोल समुद्रात मोठ्या प्रमाणावर मासे उत्पादन वाढले आहे. मागील दोन महिन्यांपासून व्यवसाय पुन्हा सुरू झाला असला तरी हॉटेल व्यवसाय बंद असल्याने यंदा खवय्यांसाठी मासे आवाक्यात आले आहेत, अशी माहिती गणेश पेठेतील मासे व्ययवसायिक विशाल परदेशी यांनी दिली.

विशाल परदेशी म्हणाले, की कोरोना च्या संसर्गामुळे मार्च मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मासेमारी बंद झाली आणि प्रजनन वाढल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पाठोपाठ पावसाळा आल्याने अशीही मासेमारी बंदच राहिली. दोन महिन्यांपूर्वी मासेमारी पुन्हा सुरू झाली. परंतु अद्याप निर्यातीला चालना नाही, दुसरीकडे हॉटेल व्यवसाय अद्यापही बंद आहेत. यामुळे खोल समुद्रात मासे मोठ्या प्रमाणात सापडत असले तरी विक्री त्याप्रमाणात नाही.

आपल्या राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या बाजारपेठा आहेत. संपुर्ण कोकण किनारपट्टीतून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. परंतु त्यातुलनेत ग्राहक नसल्याने यंदा श्रावण व गणपती दरम्यान पापलेट सुरमई सारखा एरव्ही हजार रुपये किलोच्या दरातील मासळी चे किलोचे दर 300 ते 500 रुपये दरम्यान होते. दर रविवारी मच्छी मार्केट मध्ये 15 ते 20 टन मासळीची विक्री व्हायची ती यंदा 8 ते दहा टनांपर्यंत कमी झाली आहे. इतरवारी तर ही विक्री त्यापेक्षा निम्म्यावर आली आहे. त्यामुळे ही दर कमी झाले आहेत.

कोरोना मुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा फटका विक्रेते व अन्य घटकांनाही बसला आहे. सर्व सामान्यांना मात्र मासळी आवाक्यात आली आहे. या व्यवसायाची परिस्थिती लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे, असे ही विशाल परदेशी यांनी नमूद केले आहे.