Corona in Maharashtra : CM ठाकरेंनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळाची बैठक, लॉकडाऊन होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज (रविवार) दुपारी 3 वाजता महत्त्वाची हाय व्होल्टेज बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. शनिवारी राज्यात 50 हजाराच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले असून या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या वर्गातील लोकांसोबत चर्चा करत आहे. त्यांच्यासोबत चर्चा करुन लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याने कठोर निर्बंध लावण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आजच्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे.

आजच्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांबरोबर इतर कॅबिनेट मंत्री हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील प्रमुख मंत्र्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यास विरोध केला केला आहे. राज्यात लॉकडाऊन करु नये अशी भूमिका यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जातो याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

दुसरीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे. याच मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण यासंदर्भात चर्चा होणार आहे. केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती लक्षात घेता देशात आणखी कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.