‘कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व आणि माणुसकीची भावना वाढीस लागली’

पोलीसनामा ऑनलाईन, माजलागांव, दि. 17 जानेवारी : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले. पण, या काळातील लॉकडाऊन आणि कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. माजलगांव येथे आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कोरोना वॉरियर्स डॉक्टर, सरकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, पोलिस यंत्रणा यांनी केलेल्या कार्याचे महत्व जाणून माजलगाव पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी नमूद केले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि.16) आयोजित दर्पण, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रम रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार प्रकाश सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, भाजप नेते रमेश आडसकर, नगराध्यक्ष शेख मंजूर, सभापती जयसिंह सोळंके आदी उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले, आपण प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना योद्धयांचा सन्मान करत असलो तरी अनेकांनी जीवाची पर्वा न करता दुसर्‍यांची मदत केलीय. यापूर्वी सुप्रिया सुळे, अजित पवार माजलगाव पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी आले होते, आज मी आलो आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली. यावेळी प्रकाश सोळंके यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यांचा केला गौरव..
पत्रकार तुकाराम येवले यांचा दर्पण पुरस्काराने तर सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख,टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर यांच्यासह, नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे यांनाही विशेष सन्मानाने गौरविले.