‘या’ 2 गोष्टी करून कोरोना संसर्ग टाळणे शक्य – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भाष्य केले. ‘जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. प्रशासनाने रूग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच आपण कोरोना संसर्ग टाळू शकतो’, असे ते म्हणाले.

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्यात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. सध्या या प्रश्नांवर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रूग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. कोरोना काळात जिल्ह्यात अनेक प्रकारे आरोग्यविषयक सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आयसीयू, शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच रूग्णालयातील दंत विभाग, आकस्मिक विभाग, फिजिओथेरपी विभाग, प्रतिक्षालय, औषधी भांडार आणि सुसज्ज वस्त्र धुलाई उभारणीसाठी कामे केली आहेत’.

याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र कोरोनासारख्या एका वेगळया महामारीशी लढत आहे. यासाठी प्रत्येकजण आपापले योगदान देत आहे. कोणी दवाखान्यात, कोणी रस्त्यावर तर कोणी घरात राहून कोरोना महामारीला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा लढत आहे. या लढ्यात दिवस-रात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करूया, असेही यड्रावकर म्हणाले.