Coronavirus : धक्कादायक ! रेल्वेच्या 56 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा कहर दिवसेेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात काम करणार्‍यांनाही बाधा झाली आहे. अशीच एक घटना पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतील 56 कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी (आरपीएफ), लोको पायलटसह निवृत्त कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

कोरोनाची आतापर्यंत लागण झालेल्या 56 कर्मचार्‍यांमध्ये मध्य रेल्वेवरील 36 आणि पश्चिम रेल्वेवरील 20 कर्मचारी असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. त्यांच्यावर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 28 रेल्वे कर्मचार्‍यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आणखी 24 संशयित रुग्णही सापडले आहेत. यात मध्य रेल्वेच्या 19 आणि पश्चिम रेल्वेचे सहा कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

बाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अधिक आहेत. त्यापाठोपाठ तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाड्यांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घरातच अलग राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कार्यरत रेल्वे कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, वैद्यकीय कर्मचार्‍यांना मुखपट्टया, जंतुनाशके, पीपीई किट्स अशी साधने तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.