राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून सगळ्यांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण मनसे प्रमुख राज ठाकरे हे विना मास्कचे फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राज यांना मास्क न घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी इतरांना मास्क न घालण्याचे आवाहन केले. यावरून अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांच्याकडून औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे म्हणले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे विना मास्क आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी मी मास्क घालतच नसल्याचं असे उत्तर दिले. त्यानंतर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क उतरवण्यास सांगितले होते. राज ठाकरे मास्क न घालण्याचे आवाहन करत असल्याने राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे रत्नाकर चौरेंनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. मात्र, राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क न घालण्याचं आवाहन करत आहे. तसेच त्यांचे अनुनय करणाऱ्यांचे प्रमाण मोठं आहे. जर राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क घालू नका, असे सांगत असेल तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांनी उपस्थित केला आहे. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांच्याकडून करण्यात आली आहे.