गेल्या 24 तासात 511 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 7 पोलिसांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उच्चांकी रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरात गेल्या 24 तासात 511 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत पोलिसांचा आकडा 173 वर गेला आहे.

राज्यात 1 हजार 818 पोलीस अधिकाऱ्यांसह 15 हजार 94 पोलीस कर्मचारी असे एकूण 16 हजार 912 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यापैकी 1 हाजर 421 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 298 पोलीस कर्मचारी असे एकूण 13 हजार 719 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 हजार 20 पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 511 पोलिसांची भर पडली आहे. आतापर्यंत दिवसाला तिनशे ते चारशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोना बाधित पोलिसांच्या आकड्याने पाचशेचा आकडा पार केल्याने पोलिसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढताना दिसत आहे. तर 7 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, कोल्हापुर आणि सातारा मध्ये प्रत्येकी एक तर नागपुर शहर मधील दोन पोलिसांचा समावेश आहे.