Coronavirus : ‘कोरोना’साठी ‘वरदान’ ठरत असलेल्या ‘त्या’ इंजेक्शनचा काळाबाजार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या एक्टेमेरिया इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, अशी माहिती समोर येत आहे. ज्यांना करोना विषाणूची लागण आहे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता टॉसिलिझम्ब एक्टेमेरिया 400 एमजी तसेच रेमिडीसेव्हर 100 एमजी या दोन महागड्या इंजेक्शनची आवश्यकता असते. मात्र, ही इंजेक्शन कुठेच मिळत नाही, त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. अगोदर संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीवर रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करताहेत. त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी टॉसिलीझीम 400 एमजी या इंजेक्शनची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी तीन दिवस सादिक सुर्वे शेकडो किलोमीटर फिरले. शेवटी घाटकोपर येथे एका S K Distributor येथे त्यांना हे औषध मिळेल, अशी माहिती मिळाल्यानंतर ते थेट त्यासाठी औषधाकरता रत्नागिरीहून मुंबईला 7 ते 8 हजार रुपये खर्चून आले. सादिक सुर्वे यांना ते इंजेक्शन मिळाले मात्र, डिस्टब्युटर्सच्या डेबिट मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण आली. त्यामुळे पुन्हा एटीएममध्ये पैसे काढायला सादिक गेले. पण, त्यांच्या एटीटीएम कार्डाची मर्यादा 25 हजार रुपयाची असल्याने वरचे 6 हजार 500 रुपये कुठून आणायचे ? असा प्रश्न पडला. यामुळे त्यांचा पूर्ण दिवस इंजेक्शन घेण्यात गेला. सादिकसारखे अनेक सामान्य लोकं आहेत कि, ज्यांना टॉसिलिझिम हे इंजेक्शन मिळवण्याकरीता अडचणींचा सामान करावा लागतोय.

या इंजेक्शनचा आता काळाबाजार केला जातोय. सुमारे 31 हजार 500 रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन आता 40 हजार ते 1 लाख 14 हजार रुपयांपर्यत विकले जातेय, असे समजते. टॉसिलिझिम 400 एमजी या इंजेक्शनमुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसेच कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरा होतो. हे अनेकांच्या लक्षात आल्याने त्याचा काळाबाजार सुरू झालाय. हे सरकारला कळताच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी हे इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे अचानक भेट दिली. गेल्या काही महिन्यापासून टीसिलिझिम 400 एमजी हे औषध कोरोना रुग्णांना वरदान ठरतय, हे लक्षात यायला सरकारला इतका वेळ का लागला? लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ लोकांवर आली असताना हजारो रुपयांचे हे औषध लोकांना परवडणार कसं? याच्या किंमतींवर सरकार नियंत्रण आणणार कि नाही? लोकांना सरकार दिलासा केव्हा देणार? असे अनेक प्रश्न पडत आहेत मात्र, याची उत्तरे कुणाकडेच नाही, असेच चित्र आहे.