Coronavirus : ‘कोरोना’वर आयुर्वेद उपचारांसाठी मंजुरी नाही !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेद उपचारातून नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोना विषाणूला आळा घालण्याबाबत बर्‍याच सूचना केंद्रीय आयुष मंत्रालयाने जारी केल्या आहेत. तर राज्यात अद्याप कोरोनाबाधितांवर आयुर्वेद पद्धतीने उपचाराला शासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या उपचार पद्धतीवर शासनाचा विश्वास नाही का, असा प्रश्न आयुर्वेद तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या पुणे आणि मुंबईत आहे. त्यामुळे शासनाने मुंबईच्या आर.ए. पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात 380 खाटांची सोय केली आहे. तेथील डॉक्टरांसह इतर कर्मचार्‍यांकडून वरळी परिसरात रक्तदाब, मधुमेहसह इतर जोखमींच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे चांगले निकाल असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

आयुर्वेद उपचारांनी अनेक असाध्य आजाराचे रुग्ण बरे होत असल्याचे आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे कोरोनावरही उपचार शक्य असल्याचे त्यांचे मत आहे. या तज्ज्ञांच्या दाव्यावरून आयुष संचालनालयाने शासनाकडे कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेद पद्धतीने उपचाराला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावात राज्यातील पाच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांसह इतर आयुर्वेद तज्ज्ञांचा या रुग्णांना लाभ होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्याला अद्याप शासनाची मंजुरी न मिळाल्याने या क्षेत्रातील जाणकार आश्चर्य व्यक्त करीत आहेत.