फडणवीस आणि अजितदादांना ‘कोरोना’ची लागण, चंद्रकांत पाटलांची तुफान ‘टोलेबाजी’ !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता दोघांना भेटण्यासाठी कोरोना होण्याची गरज नाही असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) सुनावणी 4 आठवडे पुढं ढकलली आहे. त्यामुळं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याशिवाय त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी कोरोनाची बाधा झाल्यानं आपल्या शैलीत टोलेबाजी केली आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आधीच सांगितलं होतं की, ते कोरोनाची बाधा झाली तर सरकारी रुग्णालयात दाखल होणार. त्यानुसार त्यांच्यावर आता सेंट जॉन्स शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. अजितदादाही ब्रीच कँडीतच आहेत. त्यामुळं ते एकमेकांशी चर्चा करत असतील. परंतु कोरोनामुळं एकमेकांना भेटता येत नसेल” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘दोघांना भेटण्यासाठी कोरोनाच व्हावा लागतो असं काही नाही’
पुढं बोलताना ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं दोघांना भेटण्यासाठी कोरोनाच व्हावा लागतो असं काही नाही. त्यांना भेटायला हॉस्पिटल एकच साधन आहे असंही नाही.” अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकारला रस आणि गांभीर्यसुद्धा नाही. सरकारच्या मनात नेमकं आहे तरी काय ? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सुप्रीम कोर्टात जे झालं त्यावरून या सरकारला आरक्षण देण्यात रस नाही, सरकार बेपर्वा आहे हेच दिसतं अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.