Coronavirus : ‘सत्य कसं डिलीट होऊ शकतं, तेच पाहुया’; महिला खासदाराचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाची दुसरी लाट अधिक चिंताजनक झाली असतानाच यावरून परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार कमी पडत असल्याची टीका होत आहे. यावरून ट्विटच्या माध्यमातून अधिक टीका होत आहे. असे केलेल्या काही जणांचे ट्विट काढून टाकण्याचे आदेश मोदी सरकारने ट्विटरला दिले आहेत. या आदेशावरून अनेक जणांनी केंद्रावर तिकस्त सोडले आहे. या प्रकारावरून आता टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्राला लक्ष करत सत्य कसे डिलीट होते, अशी टीका केली आहे.

काही जणांनी केलेल्या ट्विटवरून केंद्राच्या आदेशानंतर ट्विटरनेही काही जणांचे ट्विट डिलीट केले आहेत. म्हणून टीएमसीच्या खा. महुआ मोईत्रा ह्या संतापल्या आहेत. पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास यांच्यासह अनेकांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन केंद्र सरकारवर ट्विटवरुन टीका केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस बजावली. त्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे ट्विट असल्याने ते डिलीट केले जात असल्याचे ट्विटरने देखील म्हटलं आहे.

या दरम्यान, खा. मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन २ फोटो शेअर केले आहेत, जे केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन डिलीट करण्यात आले आहेत. मोईत्रा यांनी या फोटोसह सवाल सुद्धा समोर केलाय. या ट्विटमध्ये कोणती आणि कुठे चुकीची माहिती आहे, असा सवाल देखील खा. मोईत्रा यांनी विचारले आहे. तर सत्य कसं डिलीट होऊ शकतं हेच पाहूया, ही पोस्ट अधिकाधिक शेअर करा, असा इशारा देखील त्यांनी दिल्या आहेत. या दरम्यान, केंद्र सरकारच्या या कारवाईवर समाज माध्यमातून नाराजी व्यक्त करत, संताप व्यक्त होताना दिसत आहे.