उपासमारीचा बळी ! अखेर सलून व्यावसायिकाचा मृत्यू, 4 वर्षाच्या मुलासोबत घेतलं होतं विष

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यातील सर्व सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच उपासमारीने सांगली जिल्ह्यातील एका सलून व्यवसायिकाचा बळी घेतला असून सलून व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट आहे. या सलून व्यावसायिकाने आपल्या चार वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वत: विष प्राशन केले होते. अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.नवनाथ साळुंखे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील विष प्राशन केलेल्या सलून व्यावसायिकाचा अखेर गुरुवारी (दि.18) मृत्यू झाला. नवनाथ याने आर्थिक लॉकडाऊनला कंटाळून 4 वर्षाच्या मुलासह स्वत: विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नवनाथ आणि त्याच्या मुलाला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान नवनाथचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच उपासमारीला कंटाळून नवनाथ यांनी 10 जून रोजी आपल्या मुलासह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले, मात्र, नवानाथ यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राज्यात लॉकडाऊन 4 नंतर सलून दुकाने सोडून सर्व व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली. सलून दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सलून दुकानदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊन दुकाने चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समजाकडून केली जात आहे.