मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडणार

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे अनेकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. मात्र, कोरोनाचा फायदा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील रखडलेल्या एका कामासाठी होणार आहे. कोरोनामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर वाहनांमध्ये लक्षणीय घट झाल्याने याच मार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल हटविण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. जून 2017 मध्ये हा पूल हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तेव्हा जाहीर केले होते. मात्र ब्रिटिशकालीन हा ठेवा जतन करण्याची मागणी धरत तेव्हा यास विरोध झाला होता. पण आता भारत लॉकडाऊन असल्याने कोणीच घराबाहेर पडू शकणार नाही, हीच बाब लक्षात घेत 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पूल नेस्तनाबूत केला जाणार आहे. त्यावेळी वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई अर्थात राष्ट्रीय महामार्ग नंबर चार कडे वळवण्यात येणार आहे.

ऐतिहासिक अमृतांजन पूल 1830 साली उभारण्यात आला होता. खंडाळा-बोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल उभारण्यात आला होता. बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे उभारलेला हा पूल कोनशिला पुलाच्या प्राचीनतेची साक्ष देतो. जुन्या पुणे-मुंबई महामार्गासाठी हा पूल ब्रिटिशांकडून बनविण्यात आला होता. मात्र या मार्गावर ताण वाढू लागला म्हणून 2000 साली पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारण्यात आला. हा द्रुतगती मार्ग याच अमृतांजन पुलाखालून जातो. पण कालांतराने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची अपघात आणि वाहतूक कोंडी अशी ओळख झाली. त्यात अमृतांजन पुलाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कारण सहा पदरी असणारा 90 किलोमीटरचा हा मार्ग अमृतांजन पुलाखाली चार पदरी होतो आणि हीच बाब वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरते. म्हणूनच जून 2017 मध्ये पूल हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि आता एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तो हटविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

पूल नेस्तनाबूत करताना अंडा पॉईंट ते लोणावळा एक्झिट दरम्यानची वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. अमृतांजन पूल रेल्वे विभागाघच्या हद्दीत असल्यामुळे रेल्वे विभाकडे ही एमएसआरडीसी आधीच पत्र व्यवहार केलेले आहेत. अमृतांजन पूल हटवल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी रोखली जाणार आहे का? हा प्रश्न उपस्थितीत होतो.