Coronavirus : आरोग्य मंत्रालयानं बदलला ‘ग्रीन’ झोनचा नियम, आता 21 दिवसांचा ‘फॉर्म्यूला’ लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे लागू असलेला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार असून यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने ग्रीन झोनच्या नियमात बदल केले आहेत. आता ज्या जिल्ह्यांमध्ये मागील २१ दिवस नवीन प्रकरणे समोर आली नाहीत त्यांना ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केले जाईल. पहिल्या २८ दिवसांत नवीन प्रकरण न आल्यास ग्रीन झोनचा दर्जा दिला जात होता.

आरोग्य मंत्रालयाच्या नवीन वर्गीकरणानुसार, मागील २१ दिवसांत कोणतेही प्रकरण नोंदले गेले नाही, तर एखाद्या जिल्ह्याला ग्रीन झोन मानले जाईल. मंत्रालयाने देशातील ३१९ जिल्ह्यांना ग्रीन झोन म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर १३४ जिल्हे रेड झोन आणि २८४ जिल्हे ऑरेंज झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू, अहमदाबाद यांसह सगळ्या मेट्रोसिटीला रेड झोनमध्येच ठेवले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील १४, दिल्लीचे ११, तामिळनाडूचे १२, उत्तर प्रदेशचे १९, बंगालचे १०, गुजरातचे-मध्य प्रदेशचे ९, राजस्थानमधील ८ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

आरोग्य मंत्रालयाने बिहारमधील २०, उत्तर प्रदेशचे ३६, तामिळनाडूचे २४, राजस्थानचे १९, पंजाबचे १५, मध्य प्रदेशचे १९, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. तर आसाममधील ३०, छत्तीसगडचे २५, अरुणाचल प्रदेशचे २५, मध्य प्रदेशचे २४, ओडिशाचे २१, उत्तर प्रदेशचे २०, उत्तराखंडच्या १० जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.

यादरम्यान देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून ३५ हजार ४३ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १८२३ नवीन प्रकरणं समोर आली आहेत, तर या विषाणूच्या संसर्गामुळे एकूण ११४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी गेल्या ६७ लोकांचा मृत्यू मागच्या २४ तासात झाला आहे. आतापर्यंत ८८८९ लोक बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह प्रकरणे २५ हजार ७ झाली आहेत.