10 वी आणि 12वी च्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना संचारबंदीत शिथिलता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका लॉकडाऊनमुळे शाळेत किंवा शिक्षकांकडे अडकून पडल्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासल्याशिवाय दोन्ही इयत्तांचा निकाल जाहीर करता येणार नाही. तसेच पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रीया देखील पार पडू शकत नाही. त्यामुळे दहावी-बारावी राज्य मंडळाने निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी शिक्षकांना उत्तरपत्रिकांची ने आण करणे शक्य व्हावे यासाठी संचारबंदीत शिथिलता देणे आवश्यक होते. तशी मागणी शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केली होती.

शिक्षकांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना व सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाशी संबंधित सर्व अधिकारी, शिक्षक, नियामक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष उत्तरपत्रिका तपासणीच्या कामांकरिता पास देऊन प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहावी आणि बारावीचा निकाल 10 जून पूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. तसेच संचारबंदीच्या काळात शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आणि वाहतूक सेवाही बंद झाली. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येणे जाणे कठीण झाले. मात्र लॉकडाऊनचा कालावधी पाहता उत्तरपत्रिका तपासणी वेळेत न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून संचारबंदीच्या काळात विशेष बाब म्हणून शिक्षकांना पास देऊन उत्तरपत्रिका ने आण करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रवास करताना संबंधीतांनी मंडळाचे लेखी आदेश व स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक असणार आहे. यामुळे नऊ विभागातील उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रवास करता येणे शक्य होणार आहे. तसेच यासाठी सार्वजनिक व खाजगी वाहनांचा वापरत करता येणार असून त्याचा तपशील आवश्यक असल्यास मंडळालाही सादर करणे गरजेचे असणार आहे.

शिक्षक यासाठी करु शकतात प्रवास
शिक्षक अथवा शिपायांमार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे.
उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर किंवा पोस्टातून शाळा किंवा महाविद्यालयाकडे पाठविण्यासाठी
परीक्षकांकडून नियमकाकडे उत्तरपत्रिका पोहचवणे
नियमकांकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे
परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी चौकशी करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी प्रवास करणे