‘कोरोना’मुळे माणुसकी हरवली ! कोरोनामुळे सरपंच आईचे निधन, सर्वांनीच खांदा द्यायला दिला नकार, मुलाने मृतदेह खांद्यावर नेऊन केले अंत्यसंस्कार

चंदीगड : वृत्तसंस्था – कोरोनाकाळात अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील रानीतालमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोरोना संक्रमित सरपंच महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तिला खांदा देयला कोणीही पुढे आलं नाही. शेवटी एकट्या मुलाने आईचा मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून घेत अंत्यसंस्कार केले.

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील रानीताल येथे वीर सिंह या व्यक्तीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खादा द्यायला कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे या मुलाने खांद्यावर आईचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्काराचे काम केले. विशेष म्हणजे ही मृत महिला भंगवार पंचायतीच्या सरपंच राहिलेल्या आहेत.

वीर सिंह यांनी सांगितले की, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर मालकांना विचारणा केली. मात्र कोणीच तयार झाले नाही. त्यानंतर त्यांनी मृतदेह खांद्यावर नेला. यावेळी कोणीतरी हा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि ग्रामण भागातील लोकांच्या संवेदनहीनतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भंगवार पंचायतीचे उपसरपंच राजीव कुमार यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या महिलेच्या मृत्यूची माहिती आम्हाला देण्यात आली नाही. महिलेचे घर, गाव, रस्ते संपूर्णपणे सॅनिटाइज केले आहेत.