‘कोरोना’मुळं पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्यांसमोर पेच, आत जायचं की बाहेर रहायचं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून 45 दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांसमोर आता “पेच” उभा राहिला आहे. त्यांचा 45 दिवसांचा काळ पूर्ण झाल्याने आता न्यायालयात आणखी 45 दिवस पॅरोल मिळावा यासाठी वकिलांकडून अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील विविध कारागृहातून 10 हजाराहून अधिक कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. प्रथम 7 वर्षांहून कमी शिक्षा झालेले कैद्यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर पुन्हा केवळ, बँक फसवणूक, राष्ट्रद्रोह, अपहरण आणि मोक्कानुसार कारागृहात असणाऱ्या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षाही अधिक शिक्षा झालेल्या कैद्यांना देखील सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जवळपास राज्यातील विविध कारागृहातून एकूण 17 हजार कैदी सोडण्यात येत आहेत. 14 मे पासून कैदी कारागृहातून न्यायालयाच्या आदेशानुसार सोडले जात आहेत. त्यात जवळपास 45 दिवसांचा जामीन आहे. मात्र आता सोडण्यात आलेल्या बहुतांश कैद्यांचे जामिनाचे दिवस संपत आले आहेत. मात्र राज्य शासनाने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढन धोका निर्माण होऊ नये यासाठी या कैद्यांना सोडण्यात आले आहे. मात्र आता त्यांचे जामीनाची वेळ संपत आली आहे. त्यामुळे मोठा पेच कैदी, पोलीस आणि कारागृहासमोर उभा टाकला आहे. त्यामुळे आता कैद्यांनी त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात आणखी 45 दिवस जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप त्यावर सुनावणी झालेली नाही. पण याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यात ज्या कैद्यांना 45 दिवसांच्या जामिनावर सोडण्यात आले होते. त्यातील काही जणांचे 45 दिवस पूर्ण होत आले आहेत. पंरतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे कैदी संभ्रमात आहेत. मी 20 ते 22 जणांचे अर्ज न्यायालयात दाखल केले असून, आणखी 45 दिवसांचा त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे.

ऍड. विजयसिंह ठोंबरे
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, पुणे