पतंजलीचा दावा ! ‘कोरोनिल’नं 3 दिवसात 69 % तर 7 दिवसामध्ये 100 % ‘कोरोना’ रूग्ण होणार बरा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध बनविल्याचा दावा केला आहे. सोमवारी बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये कोरोनिल औषधाचे लाँचिंग केले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, आम्ही औषधाच्या दोन चाचण्या केल्या. पहिली – क्लिनिकल नियंत्रण अभ्यास, द्वितीय- क्लिनिकल नियंत्रण चाचणी. आम्ही दिल्लीपासून बर्‍याच शहरांमध्ये क्लिनिकल कंट्रोल अभ्यास केला आहे. त्याअंतर्गत आम्ही 280 रुग्णांचा समावेश केला. क्लिनिकल अभ्यासाच्या निकालांमध्ये, 100 टक्के रुग्ण बरे झाले आणि महत्वाचे यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. कोरोनाच्या सर्व टप्प्यांना आम्ही थांबवू शकलो. दुसर्‍या टप्प्यात क्लिनिकल कंट्रोल चाचण्या घेण्यात आल्या.

बाबा रामदेव यांनी दावा केला की, 100 लोकांवर क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा अभ्यास घेण्यात आला. 3 दिवसात 69 टक्के रुग्ण बरे झाले, म्हणजे पॉझिटिव्ह पासून ते निगेटिव्ह झाले. ही इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. सात दिवसांतच 100 टक्के रुग्ण बरे झाले. आमच्या औषधाचा रिकव्हरी दर शंभर टक्के आणि मृत्यू दर शून्य टक्के आहे. बाबा रामदेव पुढे म्हणाले की, क्लिनिकल कंट्रोल चाचण्यांबाबत अनेक मंजुऱ्या घ्याव्या लागतात. त्यासाठी नैतिक मान्यता घेण्यात आली, त्यानंतर सीटीआयआरची मान्यता व नोंदणी करण्यात आली. जरी लोक आत्ता आमच्याकडे या दाव्यावर प्रश्न विचारत असले तरी आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आम्ही सर्व वैज्ञानिक नियमांचे पालन केले आहे.

तसेच, हे औषध तयार करण्यासाठी फक्त देशी घटकांचाच उपयोग केला असल्याचेही बाबा रामदेव यांनी यावेळी म्हंटले. ज्यामध्ये मुलेठी- काढयासह अनेक गोष्टी टाकण्यात आल्या आहेत. तसेच गिलोय, अश्वगंधा, तुळशी, श्वसरीचादेखील उपयोग केला गेला. आयुर्वेदापासून बनविलेले हे औषध येत्या सात दिवसात पतंजलीच्या दुकानात उपलब्ध होईल. याशिवाय सोमवारी एक अ‍ॅप लाँच केले जाईल.