Corona : खासदार सुप्रीया सुळेंनी 7 मार्चपर्यंतचे कार्यक्रम केले रद्द, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. शिवाय महाविकास आघाडीतील काही वरिष्ठ मंत्र्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, लॉकडाऊन टाळण्यासाठी राज्यातील जनतेने काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझे 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. 22 फेब्रुवारी रोजी मी पुणे येथील कार्यालयात भेटींसाठी उपलब्ध राहणार होते. परंतु या भेटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा दृढपणे मुकाबला करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ’मी जबाबदार’ नागरीक आहे, त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी मी आवश्यक ती काळजी घेईन हा निश्चय प्रत्येकाने करावा ही विनंती, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या नेत्यांनी मागील काही दिवसात अनेक बैठका घेतल्या आहेत, विविध कार्यक्रमांना आणि लग्न सोहळ्यांना हजेरी लावली आहे. यानिमित्ताने ते एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत. रविवारीच मंत्री छगन भुजबळ हे देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आले होते, त्यामुळे खबरदारी म्हणून पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

काल राज्यातील जनतेला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. राज्यात गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.