हृदय पिळवटून टाकणारी घटना ! कोरोना असल्याने चिमुकलीला उपचार देण्यास रुग्णालयांचा नकार. मृत्यूनंतर अहवाल आला निगेटिव्ह

रायपूर : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला असून, कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील कमी पडू लागल्या आहेत. यामुळेच एक दुर्देवी आणि हृदयाला धक्का बसणारी एक घटना घडली आहे. दुर्ग जिल्ह्यातील एका २ वर्षीय चिमुकलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हा रुग्णालयाने उपचार नाकारल्याने त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. दुसरं म्हणजे त्या लहान मुलीच्या मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, यावरून तिच्या कुटुंबाला एक धक्का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, २ वर्षाच्या मुलीला ताप आणि अतिसाराचा त्रास होत असल्यानं तिला दुर्गमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीत तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मुलीवर उपचार सुरू झाले. परंतु, तिची प्रकृती सुधारली नाही. दुर्ग येथे व्हेंटिलेटर नसल्यानं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना तिला रायपूरच्या पंडरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर पंडरी जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर कुटुंबियांना जवळजवळ तासभर डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागली. परंतु, त्या मुलीला कोरोना असल्याने त्यांनी व्हेंटिलेटर देण्यास नकार दिला. परत तेथून त्या रुग्णालयांनी मुलीला मेकाहारा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. नंतर, मेकाहारातील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी बेड उपलब्ध आहे का हे बघण्यात जादा अवधी गेला. त्याक्षणी मुलीच्या कुटुंबियांनी मुलीची प्रकृती बिघडत असून तिच्यावर उपचार सुरू करण्यासाठी विनंती केली. परंतु, तेथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करण्याची तयारी दर्शवली. परंतु, तोवर त्या चिमुकलीने आपला जीव गमावला होता.

दुर्ग जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबियांनी मुलीला दुर्ग जिल्ह्यात आणलं. तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यस्कार झाल्यानंतर त्या चिमुकलीच्या कुटुंबियांना मोबाईलवर मुलीच्या कोरोना रिपोर्ट आला. तेव्हा कुटुंबियाला सोडून गेलेली चिमुकलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्या चिमुकलीला कोरोना झाला होता म्हणून रुग्णालयात दाखल करून घेतले नाही, खरं तर, तिला तर कोरोना नव्हताच..