Coronavirus : जगात ‘या’ ठिकाणी नाही ‘कोरोना’, हजारो शास्त्रज्ञ वास्तव्याला

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले. जगभरातील प्रत्येक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. सारे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना फक्त एका भूभागावर कोरोनाचा संसर्ग अजिबात झालेला नसल्याचे दिसून येते. तो प्रदेश आहे अंटार्क्टिकाचा. या ठिकाणी मास्क न वापरता तसेच कोरोनाचे दडपण न घेता मुक्तपणे फिरता येते.

सध्या अंटार्क्टिकावर सुमारे 1 हजार शास्त्रज्ञ व त्यांचे मदतनीस वास्तव्यास आहेत. हिवाळ्याच्या मोसमात शास्त्रज्ञांची नवी तुकडी ज्यावेळी अंटार्क्टिकावर येईल त्यावेळी त्यांच्या सोबत कोरोना साथीने या प्रदेशात प्रवेश करु नये अशीच सर्वांची इच्छा आहे. अंटार्क्टिकावर ब्रिटनचे रोथेरा रिसर्च सेंटर आहे. तेथील शास्त्रज्ञ रॉब टेलर यांनी सांगितले की, कोरोनापासून आम्ही सर्वजण या प्रदेशात सुरक्षित आहोत. कोरोना साथ येण्याच्या आधी अंटार्क्टिकावरील शास्त्रज्ञांचा आयुष्याबद्दल सर्वांनाच काहीसे वाईट वाटत असे.

कारण या प्रदेशाचा जगाशी फारसा संपर्क येत नसल्याने अंटार्क्टिकावर राहणारा माणूस काहीसा एकटा पडतो. जणू विलगीकरणात अनेक दिवस राहावे लागते तशी येथील माणसांची अवस्था असते. रॉब टेलर म्हणाले की, कोरोना काळात लॉकडाऊन लागू केल्यानंतर ब्रिटनमधील नागरिकांना जितके कमी स्वातंत्र्य उपभोगायला मिळत होते, त्यापेक्षा कितीतरी मनमोकळेपणाने आम्ही अंटार्क्टिकामध्ये वावरत आहेत.

सध्या या ठिकाणी वास्तव्यास असलेले शास्त्रज्ञ विविध प्रकारे खेळ खेळून आयुष्यातील रंग कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. अंटार्क्टिकावरील अतिशय थंड वातावरण हे 40 वर्षावरील व्यक्तींच्या आरोग्यासाठी फारसे चांगले नाही असे सांगितले जाते.