Coronavirus : ‘कोरोना’मुळं दररोज सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ‘या’ 5 राज्यांमध्ये देशातील 60 % अ‍ॅक्टीव्ह केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोविड – 19 संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसच्या आकडेवारीत भारत आता दुसर्‍या स्थानावर आहे. मंगळवारी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात 38.5 लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 5.8 कोटी चाचण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात 76 लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, देशातील 5 राज्यांत कोरोनाच्या एकूण सक्रीय प्रकरणांची संख्या 60 टक्के आहे.

“राजेश भूषण यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात 29.5 %, कर्नाटकात 9.9%, आंध्र प्रदेशात 9.4 %, उत्तर प्रदेशात 6.8 % आणि तामिळनाडूत 4.7 %” सक्रिय प्रकरणे आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान मृतांचा आकडा 409 वर पोहोचला आहे. तर 1 ते 7 जुलै दरम्यान ही संख्या 202 होती. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या मृत्यूंमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान , या सर्वांच्या मधोमध तामिळनाडूमधील कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत आहेत. तामिळनाडूमध्ये 23 ते 28 जुलै दरम्यान मृतांची संख्या 145 होती, परंतु 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान ही संख्या 72 पर्यंत कमी झाली आहे.

पाच राज्यात सर्वाधिक मृत्यू
त्याचप्रमाणे एकूण मृत्यूंपैकी 69 % मृत्यू केवळ पाच राज्यात आहेत. ही राज्ये आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेश. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 27,787 लोक संक्रमणामुळे मरण पावले आहेत आणि हे भारतातील एकूण मृत्यूंपैकी 37.02% आहे.
तामिळनाडूमध्ये संसर्ग झाल्यामुळे एकूण 8,090 लोकांचा मृत्यू झाला आणि एकूण मृत्यूंपैकी हे 10.78% आहे.
कर्नाटकमध्ये एकूण 6,808 लोक मरण पावले आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी हे 9.07% आहे.
दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण 4,638 लोकांचा मृत्यू झाला असून हे 6.18 % आहे.
आंध्र प्रदेशात या संसर्गामुळे आतापर्यंत एकूण 4,634 लोकांचा बळी गेला आहे आणि एकूण मृत्यूंपैकी हे 6.17 %आहे.