आवाजावरून सापडणार ‘कोरोना’चा रुग्ण, BMC चा असा आहे ‘प्लान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत झाला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईत जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. आता मुंबईत आवाजाच्या नमुना घेऊन कोरोनाचे निदान करण्यात येणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पुढील आठवड्यात कोरोना बाधित रुग्णांची चाचणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घेऊन चाचणी केली जाणार आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये 1 हजार संशयित रुग्णांची पहिल्या टप्प्यात चाचणी केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली आहे. प्राथमिक स्तरावही चाचणी केली जाणार असून हा प्रयोग यशस्वी झाला आणि योग्य निकाल हाती आला तर याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

या प्रयोगाचा फ्रान्स, इटलीतही वापर
दरम्यान, फ्रान्स आणि इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी व्हॉईस अ‍ॅनालिसिसचा वापर करण्यात आला आहे. राज्यात नवी मुंबई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने व्हॉइस अ‍ॅनालिसिसचा प्रोग्राम सुरु केला होता. याचाच वापर आता करण्यात येणार आहे.

तर रुग्णांपर्यंत कमी वेळेत पोहचू शकतो
संशयित रुग्णांच्या आवाजाचे नमुना घेऊन त्याची तुलना आरटी-पीसीआर निकालांशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईतील इतर रुग्णालयामध्ये याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांपर्यंत कमी वेळत पोहचता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

अशी होणार चाचणी
यापूर्वी कोरोना झालेल्या रुग्णांच्या आवाजाचा डेटा तयार करण्यात आला आहे. हा डेटा एका अ‍ॅपमध्ये टाकण्यात आला आहे. नवीन संशयित रुग्णाला स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरद्वारे आपल्या आवाजाचा नमुना रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्या आवाजाचा नमुना हा कोरोनाबाधित रुग्णांच्या आवाजाशी तुलना केली जाईल, त्यातून हे अ‍ॅप कोरोनाची लागण झाली आहे की नाही याचे परिक्षण करुन अहवाल देईल.
तरच मंजूरी देण्यात येईल

या प्रकल्पाला अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही. संपूर्ण नियमांचे पालन करून आणि हा प्रकल्प किती फायदेशीर आहे, याची खात्री करून याला परवानगी दिली जाईल असे एका पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.