धक्कादायक ! ऑक्सिजन रुग्णवाहिकेअभावी नागपुरात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू

पोलीसनामा  ऑनलाईन टीम : ऑक्सिजन रुग्णवाहिकेअभावी नागपुरात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. नितीन अडयालकर (53 वर्ष) असे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नितीन होम आयसोलेशनमध्ये होते.

शनिवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबियांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलवली. अ‍ॅम्ब्युलन्स आली मात्र त्यात ऑक्सिजन नसल्यामुळे नितीन यांना रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्यानंतर अडयालकर कुटुंबियांनी मनपा, इंदिरा गांधी (मेयो) रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय सर्व ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्ससाठी फोन केले.

त्यानंतर तब्बल साडे तीन तासांनी अ‍ॅम्ब्युलन्स आली. त्यानंतर नितीन अडयालकर यांना शासकीय रुग्णालयात नेले. तिथ् अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तपासणी करण्यात आली. मात्र तोपर्यंत नितीन यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते हरीश अडयालकर यांचा तीन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे अडयालकर कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.