पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखल्याने रुग्णाचा मृत्यू, पोलिसांनी आरोप फेटाळले

जींद/हरियाणा : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. काही राज्यामधील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणारी एक गाडी पोलिसांनी रात्रभर रोखून धरल्याने एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली असून त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे.

ही घटना हरियाणातील जींद जिल्ह्यात घडली आहे. येथील एका इनोव्हा चालक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पंजाबच्या धुरी येथून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जात होता. इनोव्हा चालकाला रुग्णाचा ऑक्सिजन संपण्यापूर्वी हरियाणा आणि दिल्ली ओलांडून रात्री तीन पर्यंत गाझियाबाद येथे पोहचायचे होते. मात्र रात्री 11 च्या सुमारास जींद पोलिसांनी त्याला आडवले. पोलिसांनी गाडीची तपासणी करुन सकाळी गाडी सोडली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ऑक्सिजन पोहचेपर्यंत कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता.

इनोव्हा चालकाने सांगितले की, गाडी मालकाच्या नातेवाईकावर गाझीयाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तीन वाजेपर्यंत त्याला ऑक्सिजन देणे गरजेचे होते. त्यासाठी ऑक्सिजन घेऊन मी जात होतो. जींद पोलिसांनी मध्येच आडवल्याने मला वेळेत रुग्णालयात पोहचता आले नाही. तीन वाजेपर्यंत पोहचणे गरजेचे होते, मात्र पोलिसांनी मला अडवून धरल्याने मला जाता आले नाही. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी जींद पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असून, आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

पोलिसांनी गाडी अडवल्याने कोरोना बाधित रुग्णाला ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याच्या इन्जार्जने पोलिसांवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, रात्री पंजाब पासिंग असलेल्या एका गाडीला थांबवण्यात आले. या गाडीत दोन ऑक्सिजन सिलिंडर सापडले. त्यावेळी गाडी चालकाने घटनास्थळावर आवश्यक असणारी कागदपत्रे दाखवली नाहीत. पण नंतर त्याने कागदपत्रे दाखवल्यानंतर रात्रीच त्याला सोडून देण्यात आले होते.