दुर्देवी ! बेड न मिळाल्याने ते दोघे बस स्थानकावर थांबले, पत्नीच्या उशालाच पतीनं सोडले प्राण, चंद्रपूरमधील घटना

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वेळेत बेड न मिळाल्याने एका कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराविना तडफडून मृत्यू झाला. वणवण फिरूनही बेड न मिळाल्याने पत्नीने कोरोनाग्रस्त पतीसह एसटीच्या प्रवासी निवाऱ्यात आसरा घेतला अन् इथेच या रुग्णांने तडफडून प्राण सोडले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

गोविंदा निकेश्वर (वय 50 रा. अंभोरा. ता. कुही. जि. नागपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गोविंदा निकेश्वर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांची पत्नी त्यांना चंद्रपूरला घेऊन आली होती. ब्रह्मपुरी शहरात आल्यानंतर त्यांनी अनेकठिकाणी प्रयत्न केले. पण त्यांच्या पतीवर उपचारासाठी त्यांना बेड मिळाला नाही. कित्येक तास पतीला घेऊन त्या फिरत राहिल्या. पण कुठेही बेड मिळाला नाही. अखेर रात्र कुठ घालवायची तर शहरातल्या ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या एस.टीच्या प्रवासी निवाऱ्याचा आसरा त्यांनी घेतला. पण यावेळी गोविंदाची तब्येत अधिकच खालावली. संपूर्ण रात्र अशीच तडफडत निघाली अन् अखेर सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना आणखी किती बळी घेणार हा प्रश्न तर अनुत्तरीत आहे. मात्र, आणखी किती हाल, अवहेलना अन् मृत्यूचे किती कुरूप चेहरे तो आपल्याला दाखवणार हे माहित नाही.