धक्कादायक ! बिल वाढवण्यासाठी मृत्यू झालेल्या ‘कोरोना’ रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर

कोलकता : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करत आहेत. असे असताना काही गंभीर प्रकार समोर येत आहेत. खासगी रुग्णालयाकडून रुग्णाला अधिकचे बिल दिले जात असल्याचे समोर येत आहे. अशातच हॉस्पिटलचं बील वाढवण्यासाठी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बील वाढवण्यासाठी रुग्णालयाने दोन दिवस व्हेटिलेटरवर ठेवल्याचा आरोप हॉस्पिटल प्रशासनावर केला आहे. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

हुगळी जिल्ह्यातील एका कोरोना बाधित रुग्णाला कोलकात्यातल्या एका खासगी हॉस्पिलटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 31 ऑगस्टला हॉस्पिटलने 47 हजाराचं बिल दिलं. त्यापूर्वी दोन दिवस रुग्णाचे नातेवाईक पेशंटला पाहू देण्याची विनंती करत होते. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाला भेटू दिलं नाही किंवा पाहू देखील दिलं नाही. जेव्हा बील जमा करण्यात आलं. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी हॉस्पिटल विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गंभीर स्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तोपर्यंत त्याची कोविड टेस्टही झाली नव्हती. इथे आल्यानंतर टेस्ट करण्यात आली. टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले होते, असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. रुग्णाचे पोस्ट मार्टेमही करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.