सेरो चाचणी : बिगरझोपडपट्टी परिसरात प्रतिपिंडांचे प्रमाण अधिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या प्रसारासंदर्भात निश्चित शास्त्रीय माहिती उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची तिसरी सेरो चाचणी करण्यात आली. नमुना निवड पद्धतीचा वापर करुन करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 10 हजार 197 नागरिकांची चाचणी करण्यात आली असून यापैकी 36.30 टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. झोपडपट्टीच्या तुलनेत बिगरझोपडपट्टी परिसरातून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये प्रतिपिंड आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे.

जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात बिगरझोपडपट्टी परिसरात प्रतिपिंडे आढळून येण्याचे प्रमाण 18 टक्के होते. ऑगस्टमध्ये यामध्ये दोन टक्यांनी वाढ झाली तर नुकत्याच करण्यात आलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणात ते प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या हे प्रमाण 28.5 टक्के आहे.

तर झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण पहिल्या सर्वेक्षणात 57 टक्के, तर दुसऱ्या सर्वेक्षणात 45 टक्के होते. जे तिसऱ्या सर्वेक्षणामध्ये 4 टक्क्यांनी घसरुन 41.6 टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड आढळून आली. या सर्वेक्षणात महापालिका दवाखाने आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे लसीकरण न झालेल्या लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार 35.02 टक्के पुरुषांमध्ये तर 37.12 टक्के स्त्रियांमध्ये प्रतिपिंड आढळून आली आहेत.