Coronavirus : जूनमध्ये ‘कोरोना’चा झाला ‘विस्फोट’, जुलै आणि ऑगस्टची काय असेल स्थिती ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून त्याचे प्रमाण उन्हाळ्यात कमी होईल हा अंदाज चुकीचा ठरला आहे. आता मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. भारतातील रिकव्हरी रेट चांगला असला तरीही कोरोनाची लागण दर दिवशी होणार्‍यांची संख्या जास्त वेगाने वाढत आहे. जून महिन्यात भारतात जवळपास दर दिवशी 15 हजार किंवा त्याहून अधिक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं.

जूनमध्ये झालेल्या कोरोनाचा विस्फोटाची स्थिती ही जुलै महिन्यात आणखीन संवेदनशील होऊ शकते असे जाणकारांनी सांगितले आहे. जून महिन्यात अधिक कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण आढळले. डेटा तज्ज्ञाच्या मते कोरोनाची लागण आणि मृत्यू होण्याचं प्रमाण हे जूनमध्ये सर्वाधिक होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 31 मेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,82,143 होती. तर बुधवारी 1 जुलैरोजी ही संख्या 5, 85,493 वर पोहोचली आहे. मृत्यूदर पाहिला तर कोरोनामुळे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात जास्त मृत्यू झाले आहेत. केरळचे ज्येष्ठ डेटा तज्ज्ञ जेम्स विल्सन यांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात 5 ते 6 लाख नवीन रुग्ण आढळतील असा अंदाज आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मृत्यूची नोंदही अधिक असू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिना कोरोनाचा पीक टाइम असेल असा दावाही काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधीच पावसाळ्यात विविध साथीचे रोग आणि त्यामध्ये असलेल्या कोरोनामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.