कोरोना काळात मुलीचं लग्न बनलं वडिलांच्या मृत्यूचे कारण, जाणून घ्या प्रकरण

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात लग्न सोहळ्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, यातील निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने एका वधुपित्यावर दंड आकारण्यात आला. त्यामुळे या कारवाईचा धसका घेऊन वधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाकडून दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याची जमीन गहान ठेवावी लागली आणि पैसे जमा करावे लागले. मात्र ३ दिवसानंतर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीडित कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कापरेन नगरपालिकेच्या परिसरात येणाऱ्या अडीला गावात एका लग्न समारंभात कोविड १९ नियमांचे उल्लंघन झालं. त्यामुळे प्रशासनाकडून वधू पित्याला १ लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी शेतकरी असलेल्या वधू पित्याला जमीन गहाण ठेऊन रक्कम भरावी लागली. मात्र, या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांचा २० मे रोजी मृत्यू झाला आहे. मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

“१४ मे २०२१ रोजी माझ्या लहान मुलीचं लग्न कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होत होतं. त्यात कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करण्यात आलं. सर्व व्यक्ती मास्क आणि सोशल डिस्टेसिंगचं पालन करत होते. त्यासह लग्न समारंभात मर्यादित संख्या होती असं त्यांचे म्हणणं आहे. त्याचवेळी कुटुंबातील ७ लोक जेवण करत होते. तेव्हा काही अधिकारी आमच्या घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या येण्याने गावकरीही जमले. या गर्दीचा व्हिडीओ बनवून अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि त्याचसोबत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. माझ्या पतीची तब्येत आधीच खराब होती. त्यात या प्रकारामुळे तब्येत आणखी बिघडली. प्रशासनाकडून दंड भरण्यासाठी दबाव येत होता. आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशावेळी जमीन गहाण ठेऊन आम्ही दंडाची रक्कम भरली होती”, मृतकाची पत्नी बृजमोहन मीणा म्हणाल्या. त्यानंतर पतीची तब्येत बिघडली त्यांच्या उपचारासाठीही आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. त्यात २० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीमुळे आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंबाने निवेदनात केली आहे.