बेजबाबदारपणा – बेफिकिरी ! ‘तो’ तरुण मुंबईहून आला गावात आणि होम क्वारांटाईनमध्ये क्रिकेटही खेळला

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील विविध भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुणे शहरानंतर सोलापूरमध्ये कोरोना संसर्ग   जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचला आहे.  दुसरीकडे त्यात कमालीचा बेजबाबरपणा आणि बेफिकिरीसारखे दुर्गुणांचाही शिरकाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुंबईतून आलेल्या आणि सांगोला तालुक्यात थांबलेल्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती.  यापूर्वी  तो होम क्वारांटाईनमध्ये असताना गावात अन्य तरूणांबरोबर क्रिकेटही खेळला आहे. गावात मुक्तपणे वावरण्याबरोबर सांगोला व अन्य काही छोट्या-मोठ्या गावांमध्ये प्रवासही केल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.

कोरोना बाधित तरुण सांगोला तालुक्यातील घेरडी गावचा आहे. याच गावात 15 दिवसांपूर्वी टाळेबंदी  असतानासुध्दा बैलगाडा व घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्याचा प्रकार घडला होता. यात गावच्या पोलीस पाटलाविरूध्द निलंबनाची कारवाईही झाली आहे. अशा बदनामीची प्रतिमा तयार झालेल्या या गावातील कोरोनाबाधित तरूण यापूर्वी मुंबईत अंधेरी भागात उदरनिर्वाहासाठी गेला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यानंतर तो मुंबईतून पुणेमार्गे गावाकडे पायी चालत परत आला. तो गावी परतल्याची घेरडी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद झाली. त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली असता त्याला घरीच विश्रांती घेण्यास सांगितले गेले. वैद्यकीय तपासणीअंती कोरोनाची लक्षणे दिसून आली नसली तरी ‘होम क्वारांटाईन’मध्ये राहण्यासाठी त्याच्या हातावर तसा शिक्का मारणे अपेक्षित होते. परंतु अशी कोणतीही प्रक्रिया होऊ शकली नाही. हा तरूण स्वतःला कोणताही आजार झाला नसल्याचा विश्वास बाळगून सर्वत्र संचार करत होता. टाळेबंदीतही त्याने गावापासून 22 किलोमीटर अंतरावर सांगोला शहरासह अन्य काही गावांतही प्रवास केला. एवढेच नव्हे तर गावात तरूण मित्रांशी अनेकवेळा गप्पांचा फड रंगविला होता.

थोड्याच दिवसांत या तरूणाला त्रास जाणवू लागला आणि तो वाढत गेला. काल शुक्रवारी तर त्याला श्वास घेणेही कठीण होऊ लागले. तेव्हा शेवटी त्याला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले. करोना चाचणी घेण्यात आली असता त्याला कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.