Coronavirus : नांदेडमधून 4 ‘कोरोना: बाधित फरार

पोलिसनामा ऑनलाईन – नांदेडमधील गुरुद्वारा भागातील लंगरसाहिब येथे कार्यरत असलेल्या चौघांना कोरोनाची बाधा झाली होती. संबंधित चार सेवेकरी फरार झाल्याने नांदेड जिल्हा प्रशासन हादरले आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा भागातील लंगरसाहिब येथे 97 जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यातील 20 जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाळेचे नमुने घेतल्यानंतर त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले गेले नाही. ही मंडळी पुन्हा निघून गेली. रुग्णांचे अहवाल आल्यानंतर त्यातील 16 जणांना परत आणण्यात आले. मात्र, चार जण दोन दिवसांनंतरही गायब आहेत. यांनी योग्य पत्तेही दिले नव्हते. त्यामुळे यांना शोधण्याचे काम करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाला कामाला लावण्यात आले आहे.

शहरातील गुरुद्वारा भागातील लंगरसाहिब येथे वास्तव्यास असलेल्या 97 सेवादारांचा प्रशासनाने 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान लाळेचे नमुने घेतले होते. यापैकी शनिवार (2 मे) रोजी 20 जणांचे अहवाल करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. लंगरसाहिब गुरुद्वारामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे नमुने चाचणीसाठी पाठविल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांचे विलगीकरण करायला हवे होते. तसेच त्यांना निगराणीत ठेवणे बंधनकारक होते. मात्र, तसे केले गेले नाही. 20 सेवेकर्‍यांनी लाळेचे नमुने घेणार्‍यांना अर्धवट नावे सांगितली. तसेच लंगरसाहिब गुरुद्वारा हाच पत्ता असल्याचे सांगितले. या कर्मचार्‍यांना नंतर सोडून देण्यात आले. शनिवारी सकाळी या 20 जणांचे अहवाल आल्यानंतर त्यांची शोधमोहीम हाती घेण्यात आली.

या शोधमोहिमेत सकाळच्या सत्रात केवळ 10 जण प्रशासनाच्या हाती आले तर उर्वरित 5 जण सायंकाळी प्रशासनाला मिळाले. यानंतर रविवारी पुन्हा एका करोनाबाधितास ताब्यात घेण्यात आले. उर्वरित राहिलेले चार सेवादार अजूनही प्रशासनाला सापडले नसल्याची माहिती आहे.नांदेडहून साडेतीन हजारांहून अधिक व्यक्तींना बसने पंजाबपर्यंत पाठविण्यात आले. या भाविकांपैकी पाच ते सात जणांना कोरोनाबाधा झाल्याचे पंजाब येथे गेल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून नाराजीही कळविली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे होते.