आम्ही लग्नाळू ! चक्क PPE किट घालून कोविड वार्डात पोहचली ‘वधू’, कोरोना पॉझिटिव्ह ‘वरा’ने लावलं ‘कुंकू’, घातला ‘हार’

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था –  कोरोनाने सामान्यांचे जीवन रूळावरून खाली आणले आहे परंतु जीवनाची ट्रेन तरीसुद्धा धावतच आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका मेडिकल कॉलेजच्या कोरोना वॉर्डमध्ये आज वेगळेच दृश्य पहायला मिळाले, जेव्हा एक वधू पीपीई किटमध्ये तिथे पोहचली. कोविड वार्डलाच एका विवाहासाठी मॅरेज हॉलमध्ये बदलण्यात आले होते.

वर शरत मोन आणि वधू अभिरामी दोघेही अलाप्पुझाच्या केनाकारीचे राहणारे आहेत. काही दिवसांपूर्वी शरतची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. शरत परदेशात कार्यरत आहे आणि विवाहासाठी भारतात आला आहे. लग्नाची खरेदी करताना त्यास संसर्ग झाला. नंतर शरतची आई जिजिमोल सुद्धा कोरोना संक्रमित आढळली.

कोरोनामुळे शरत आणि जिजिमोल दोघे अलाप्पुजा मेडिकल कॉलेजच्या कोविड वार्डमध्ये दाखल आहेत. शरत आणि अभिरामीचा विवाह 25 एप्रिलला होणार होता. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाची तारीख पुढे ढकलण्याऐवजी रविवारीच लग्न करण्याचे ठरवले. यासाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि संबंधित अधिकार्‍यांची आवश्यक परवानगी मागण्यात आली

अखेर 25 एप्रिल रोजीच लग्न अलाप्पुजा मेडिकल कॉलेजच्या कोविड वार्डमध्ये संपन्न झाले. यासाठी वूध अभिरामी आणि अन्य नातेवाईक पीपीई किट घालून वार्डात गेले. वार्डात शरतच्या आईने वधू-वरांना एकमेकांच्या गळ्यात घालण्यासाठी हार दिले. नंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.

लग्नसराईच्या या काळात अनेक ठिकाणी कोरोनामुळे लग्न सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत तर अनेकांनी साध्या पद्धतीने साजरे केले. तमिळनाडुच्या कुड्डालोरमध्ये संडे लॉकडाऊनमुळे मंदिरांमध्ये प्रवेश बंद होता. यामुळे अनेक जोड्या मंदिराच्या गेटवरच लग्नाच्या विधी उरकत असताना दिसल्या.