पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात ‘कोरोना’चा शिरकाव ! मोठ्या कंपन्यांतील कामगाराचा अचानक मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन ४ मध्ये ग्रामीण भागातील उद्योग सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर एमआयडीसीतील काही कंपन्या सुरु झाल्या. असे असे असताना रांजणगाव व चाकण औद्योगिक वसाहतीत कोरोना शिरकाव झाला असून त्यामुळे औद्योगिक क्षेत्र हादरुन गेले आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कंपनीतील एका कामगाराचा अचानक मृत्यु झाला.

हा कामगार हडपसर भागातून कामासाठी येत होता. या कामगाराच्या मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या ५० कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे रांजणगाव एमआयडीसी एकच खळबळ माजली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी येथील एका मोठ्या कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. या कामगाराला पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हा कामगार पिंपरीतील काळेवाडी येथून चाकणाला कामाला येत होता. आता त्याच्या संपर्कातील कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या दोन घटनांमुळे नुकतेच सुरु झालेल्या कारखान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुणे व पिंपरी चिंचवडमधून येणार्‍या कामगारांना कंपनीमध्ये येऊ द्यायचे का अशा विचार कंपन्यांमधून सुरु झाला आहे.