धक्कादायक ! NSG कमांडरला ICU बेड न मिळाल्याने रस्त्यातच झाला मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यातच आता राजधानी दिल्लीत NSG च्या ग्रुप कमांडरला ICU बेड मिळाला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

वीरेंद्र कुमार झा असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यानंतर 22 एप्रिलला अर्धसैनिक दलाच्या रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान, झा यांची प्रकृती ठीक होती. मात्र, 4 मेला सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी खूप कमी होऊ लागली. नोएडाच्या रेफरल रुग्णालयात ICU बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये जवळपास 5 तासांचा कालावधी गेला आणि त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, वीरेंद्र झा यांना ICU बेड मिळावा यासाठी सुरुवातीला सुखदेव बिहार येथे रात्री 11 वाजता नेण्यात आले. मात्र, तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर दिल्लीच्या अ‍ॅस्कॉर्ट फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यामध्ये विरेंद्र यांची प्रकृती अत्यंत खालावली. रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.