Satara News : कोरोना रुग्णावर गावातच केले अत्यसंस्कार, लहान मुलीसह 8 जणांना कोरोनाची लागण

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता साताऱ्यातील एका कुटुंबाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या प्रकरणात एका आजीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या आजीला कोरोना असतानासुद्धा त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह मूळगावी नेवून अत्यसंस्कार केले. या अंत्यविधीसाठी गावकरीसुद्धा मोठ्या संख्येने हजर होते. अत्यंसंस्कार केलेली वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांना धक्काच बसला.

हे प्रकरण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील आहे. कराड तालुक्यातील विंग गावात एका ७८ वर्षीय आजीवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आजी कोरोनाबाधित असल्याचे समजल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आजीच्या अंत्यसंस्काराला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गावातील बऱ्याच लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या ४० जणांची कोरोना चाचणी केली असता, त्यामध्ये एका लहान मुलीसह ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विंग गावातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली आई आजारी असल्यामुळे तिच्या मुलीने तिला फलटण तालुक्यातील हिंगणगावात उपचारासाठी दाखल केले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण त्यांना पुढील उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबांनी हा सर्व प्रकार कोणालाही न सांगता आजींचा मृतदेह मूळ गावी आणला. त्या ठिकाणी त्या आजींवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोना बाधित आजी हॉस्पिटल मध्ये दाखल का झाल्या नाहीत? म्हणून आरोग्य विभागाने त्यांची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार झालेली आजी कोरोना बाधित असल्याचे समजताच गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ४० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर एका लहान मुलीसह ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाची गावकऱ्यांना कल्पना न दिल्यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी अजूनही कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.