होम क्वारंटाईन असलेले ‘कोरोना पॉझिटिव्ह’ फिरताहेत ‘गावभर’; मुंबईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह असताना होम क्वारंटाईन असलेले दोघे जण घरात न थांबता गावभर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात आढळून आला. या शिवाय त्यांनी हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन घेण्यास नकार दर्शविला होता. अशा दोघांवर मुंबई महापालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेंबूर विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वराज चव्हाण यांच्या वतीने वॉर्डातील आरोग्य अधिकार्‍यांनी या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या दोघांपैकी एक जण ५२ वर्षाचा आहे. त्याच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, मुलगी आणि तो स्वत: असे तिघेही जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. होम क्वारंटाईन असलेल्या लोकांना महापालिकेकडून दिवसात तीन ते चार वेळा फोन केला जातो व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. तसेच ही व्यक्ती घरी आहे किंवा नाही, याचीही चाचपणी केली जाते. महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या या फोनला घरातील व्यक्तींनी योग्य प्रतिसाद दिला नाही. तसेच महापालिकेच्या कर्मचार्‍यांशी उर्मट वर्तन केले. तेव्हा तपासणीत ही ५२ वर्षाची व्यक्ती घरात आढळून आली नाही.

चेंबूर येथील एम पश्चिम भागात राहणारी व्यक्तीही होत क्वारंटाईन असताना घरात मिळाली नाही. ती इतरत्र भटकताना आढळून आली. चेंबूर येथील वसंत पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.