चिंताजनक ! गेल्या 10 दिवसात पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची म्हणजेच 26 हजार 218 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या 10 दिवसात देशातील 19 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची वाढ होत असून त्यातील 15 हे केवळ एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर उर्वरीत मध्यप्रदेशातील इंदूर, कर्नाटकमधील बेंगळुरु, तामिळनाडूमधील चेन्नई आणि पंजाबमधील जालंधर जिल्ह्याचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये गेल्या 10 दिवसांत दररोज सरासरी 1000 रुग्ण वाढत आहेत. तर नागपुरात ही संख्या 20,104 आहे. तिस-या स्थानावर मुंबई आहे. त्याठिकाणी 10 दिवसांत 11,859 कोविड रुग्णांची वाढ झाली आहे. चौथ्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून तिथे 0,914 रुग्ण वाढले आहेत. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव जिल्हे आहेत. गेल्या एका आठवड्यात येथे अनुक्रमे 9,024, 6,652 आणि 6,598 रुग्णांची वाढ झाली आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्हा आठव्या, कर्नाटकातील बंगळुरू 9 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील अमरावती व अहमदनगर दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत, जिथे अनुक्रमे 4,250 आणि 3,962 रुग्ण वाढले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई 12 व्या स्थानावर आहे. 13 व्या स्थानावर मुंबई उपनगरे आहेत. जेथे 3,355 कोरोना रुग्ण वाढले आहेत. 14, 15 आणि 16 व्या स्थानावर यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्हे आहेत. त्यानंतर नांदेड आणि वर्धा जिल्ह्याचा क्रमांक आहे. येथे अनुक्रमे 3,326, 3,299, 3,185, 3,146 आणि 2,431 रुग्णांची नोंद झाली आहे. 19 व्या स्थानावर पंजाबमधील जालंधर जिल्हा आहे.