खासगी लॅबमध्ये 30 लोकांचा ‘कोरोना’ टेस्ट रिपोर्ट Positive अन् सरकारी टेस्टमध्ये Negative !

कानपूर : वृत्तसंस्था –    देशातील कोरोना बाधितांचा आकडा हा 57 लाखांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासात 86 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ही 90 हजारांच्या पार गेली आहे. काही लोकांमध्ये लक्षणं नसल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळं आता जास्तीत जास्त चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.

उत्तर प्रदेशाथील कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटीव्ह अहवाला दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या लॅबमध्ये ज्या 30 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे त्यांचा सरकारी लॅबमधील कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली असून सीएमओनं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

20 सप्टेंबर रोजी डीएम अलोक तिवारी आणि सीएमओ डॉ अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या तरुणानं लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानं त्यानं दुसऱ्या लॅबमध्ये टेस्ट केली तर ती मात्र निगेटीव्ह आली. त्याच्यात कोणतीही लक्षणं नव्हती. 2 वेगळे रिपोर्ट आल्यानंतर त्यानं लॅबबद्दल तक्रार केली.

स्वत: डीएम जेव्हा तपासणी करायला आले तेव्हा असं आढळून आलं की, बऱ्याच रुग्णांची नावं, पत्ते आणि मोबाईल नंबर चुकीच्या पद्धतीनं नोंदवले आहेत. डीएम अलोक तिवारी म्हणाले, चुकीचे अहवाल देणे, पॉझिटीव्ह रुग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहिणं, चाचणीसाठी जास्त पैसै घेणं असं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लॅब सील केली. एडीएम सिटीच्या देखरेखीखाली 3 सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती ज्यात 2 एसीएमओचा समावेश होता. या समितीनं लॅबची पूर्ण चौकशी केली.

या चौकशीदरम्यान 20 सप्टेंबरच्या 3 दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी रेकॉर्डची पडताळणी केली. लॅबनं ज्या लोकांना पॉझिटीव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. 30 कोरोना पॉझिटीव्ह दाखवलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. अद्याप 12 रिपोर्ट येणं बाकी आहे.

याबाबत सांगताना कानपूरचे डीएम अलोक तिवारी म्हणतात, ज्ञान पॅथॉलॉजीनं कोरोना पॉझिटीव्ह घोषित केलेल्या 30 लोकांकडून पुन्हा नमुने घेण्यात आले. आरटीपीसीआर तपास केला. त्यात सर्व रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. 30 पॉझिटीव्ह 6 दिवसात निगेटीव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्ञान पॅथॉलॉजीचे संचालक डॉ अरुण कुमार याबाबत म्हणतात की, 3 दिवसातही पॉझिटीव्ह रुग्ण निगेटीव्ह होऊ शकतात. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना टेस्ट रिपोर्ट देण्यात आला आहे. पुन्हा घेतलेल्या नमुन्यांमध्ये मानकांचे पालन केले आहे किंवा नाही हे आम्ही सांगू शकत नाहीात. कदाचित डेटा फिडींगमध्ये गडबड झाली असावी मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाही असा दावाही त्यांनी केला आहे.