Coronavirus Impact :नाशिकच्या कारखान्यात ‘नोटांची छापाई बंद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे देशातील अनेक उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. छोटे, व्यवसाय, कारखाने काही काळासाठी बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून याची साखळी तोडण्यासाठी सर्वांना घरात राहणे महत्त्वाचे असून त्यामुळे सगळी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नाशिकमध्ये असलेला नोटांचा कारखान्यालाही कोरोनाचा फटका बसला आहे. नाशिकचा नोटांचा कारखाना देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. करन्सी प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा कारखाना देशात असलेल्या नोटांच्या चार छापाई कारखान्यापैकी एक आहे. या ठिकाणी नोटा, नाणी आणि मुद्रांक निर्मिती केली जाते.

देशाच चार ठिकाणी नोटांची छापाई करण्यात येते यामध्ये महाराष्ट्रात नाशिक, मध्य प्रदेशात देवास, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी आणि कर्नाटकातील म्हैसूर या ठिकाणी नोटांची छापाई केली जाते. नाशिकमध्ये दर दिवशी पाच दशलक्ष नोटांची छापाई होते. नंतर देशभरात या नोटा वितरीत केल्या जातात. या नोटांच्या छापाईसाठी परदेशातून शाई मागवण्यात येते.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण आहेत. ही संख्या अशीच वाढत राहिली तर राज्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच गावा-गावाला जोडणारी एसटी बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रेल्वेने देशातील सर्व रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.