Coronavirus : चीन नव्हे तर ‘या’ देशातून ‘कोरोना’ची भारतात ‘एन्ट्री’, इटलीच्या पर्यटकांच्या ड्रायव्हरलाही ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदे्रक झाल्यानंतर सर्व लक्ष चीन व त्याच्या शेजारी देशातून येणार्‍यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मात्र, भारतापासून साडेपाच हजार किमी दूर असलेल्या इटलीमार्गे भारतात कोरोना चा फैलाव झाला आहे. इटलीहून आलेल्या २३ पर्यटकांपैकी १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यामुळेच भारतात कोरोना फैलाव झाल्याचे आता मानले जात आहे. हे पर्यटक जेथे जेथे गेले व ज्यांच्या संपर्कात आले. त्या सर्वांची तातडीने तपासणी करण्यात येत आहे.

या पर्यटकांना फिरविणार्‍या राजस्थानमधील एका ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता हा सर्व प्रकार अधिक धोकादायक ठरत आहे. राजस्थानमधील अनेक शहरात हे पर्यटक फिरले असल्याने तेथे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. कोरोनाचे सशंयित भारतातील सात राज्यात आढळून आले आहेत. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तेलंगणा, राजस्थान आणि हरियाना यांचा समावेश आहे. इटलीमध्ये आतापर्यंत अडीच हजार लोक कोरोना बाधित असून त्यातील ८० जणांचा मृत्यु झाला आहे. याच इटलीमधून २३ पर्यटकांचा एक जथा २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आला. तेथून ते राजस्थानमध्ये गेले. राजस्थानमधील झूझून, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर येथे फिरले. आता, त्यातील १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने २१ फेब्रुवारीपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. हे पर्यटक ज्या ज्या हॉटेलमध्ये उतरले होते. तेथील जे कर्मचारी या पर्यटकांच्या संर्पकात आले होते. त्या सर्वांच्या रक्तांचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. जोधपूरमधील ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक उतरले होते. त्या हॉटेलने तेथील दोन मजलेच बंद करुन टाकले आहेत. हॉटेलमधील सर्व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात येत आहे. जैसलमेरमधील हॉटेलमधील २० ते २५ कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली आहे.

हे पर्यटक राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आहेत. त्या काळात त्यांचा हॉटेलबाहेर कोणाकोणाशी संपर्क झाला, हे समजणे अवघड आहे. ते गावातील सामान्य लोकांमध्ये मिसळले असतील व त्यातून त्यांचा इतरांशी संपर्क होऊन कोरोनाचे विषाणु संक्रमित झाले असतील तर ते इतर लोक अनेकांना हे विषाणु संक्रमित करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

इटलीहून आलेले दोन विद्यार्थीही एका पार्टीमध्ये कोरोना लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. हे दोन विद्यार्थी आग्रा येथील असून त्यांच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इटलीहून इंदौरमध्ये आलेल्या या एका विद्यार्थीनीलाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून तिची तपासणी सुरु आहे. भारतात आतापर्यंत जे २९ कोरोगाग्रस्त लोक आढळून आले आहेत. त्यातील बहुतांश जणांचा इटलीशी संबंध असून तेथून कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे.