Coronavirus Impact : ‘कोरोना’नं थांबवली ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची कारवाई, DG ऑफिसमधून आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करताना अर्थात ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर पोलिसांनी करु नये, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. पोलिसांना सोमवारी रात्री हे आदेश मिळाले आहेत.

कोरानाला महामारी असे घोषित केले जाते. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपाय योजना केल्या आहे. ड्रंक अँड डाईव्ह केसेस करताना वाहतूक शाखेचा पोलीस एकाच ब्रीथ अ‍ॅनलायझरमधून दिवसभरात अनेकांची तपासणी करतो. एकाच्या तोंडासमोर उपकरण, पोलीस दुसर्‍याच्या, तिसर्‍याच्या असे अनेकांच्या तोंडासमोर धरतो. तसेच तो हे उपकरण स्वत: जवळ बाळगत असतो. त्यांना त्यात फुक मारायला सांगतात.

यात जर एखादा कोरोना बाधित असेल तर त्यातून कोरोनाचा विषाणू ड्रंक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो. हा धोका लक्षात आल्याने पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून सोमवारी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना आदेश पाठविण्यात आले असून ब्रीथ अ‍ॅनलायझरचा वापर करणे थांबविण्यास सांगितले आहे.

वाहतूक शाखेने दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी असा वाहनचालक दारु पिलेला आढळून आल्यास त्याची आवश्यकता वाटल्यास मेडिकल करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.