TATA ग्रुपकडून ‘कोरोना’ टेस्ट किट लॉन्च, पाऊण तासात देणार ‘रिझल्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात हजारो कोटींची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपने आता देशी कोरोना चाचणी किटची निर्मिती केली आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक (TataMD) ने ४५ ते ५० मिनिटांत अहवाल प्राप्त होऊ शकणारी किट लाँच केली आहे. त्याने परदेशी टेस्ट किटवर होणारा खर्चही वाचणार असून, मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यासाठी मदत मिळणार आहे.

यासंदर्भात सीईओ गिरीश कृष्णमूर्ती म्हणाले, हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे आहे. या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले असून, CSIR-IGIB (Council of Scientific and Industrial Research-Institute of Genomics and Integrative Biology) च्या संगनमताने ही टेस्ट किट बनवली आहे. आयसीएमआर आणि डीसीजीआयने या चाचणी किटला परवानगी दिल्याने डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये सर्वत्र ही किट उपलब्ध करून दिली जाईल.

चेन्नईतील टाटा फॅक्टरीमध्ये दर महिन्याला १० लाख किटचे उत्पादन घेण्यात येणार आहे. या किटमध्ये इमेज बेस रिझल्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या किटसाठी स्टॅंडर्ड लॅबरेटरी यंत्रणा लागणार असून, लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास ४५ ते ५० मिनिटांत पहिला अहवाल प्राप्त होऊ शकतो, तर आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा पूर्ण रिझल्ट हाती मिळण्यास ७५ मिनिटे लागणार आहेत. यासाठी स्किल स्टाफची गरज भासणार नाही. त्यामुळे ग्रामीण भाग, दुर्गम भागातही आरोग्य सेवक कोरोना चाचणी करू शकतील. त्यासाठी मोठ्या यंत्रणांचीसुद्धा गरज लागणार नाही.

‘TataMD CHECK’ ची किंमत किती ?
टेस्ट किटच्या किमतींबाबत विचारले असता, कृष्णमूर्ती यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, राज्य सरकारांनी खासगी लॅबकरिता दर ठरवून दिले आहेत, त्यामुळे राज्य सरकारे सांगतील ती किंमत असेल. आम्हाला समस्या सोडवायची आहे, कोरोनासोबत लढायचे आहे म्हणून किंमत कमीच असल्याचे त्यांनी नमूद केले.