Coronavirus : खासगी हॉस्पिटलमधील 80 % बेड्स सरकारच्या ताब्यात, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. 1 लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र, असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकारने खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड्स ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी मंगळवारी दिली.

एकाच दिवसात 1200 रुग्ण करोनामुक्त
राज्यात मंगळवारी कोरोनाचे 1200 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकाच दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून, राज्याच्या रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 25 टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांवर नेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून, खासगी डॉक्टर आणि सरकार यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात 17000 रिक्त जागा 2 महिन्यात भरणार
आरोग्य विभागातील डॉक्टर, विशेषज्ञ, परिचारिका, कर्मचारी असी 17 हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्यांच्या आत भरण्यात येतील. त्यासाठी सोमवारी विभागाची सविस्तर बैठक घेतली आहे. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाऱ्या मुलाखती देखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.