पुण्यात कोरोनाचा धोका संपलेला नाही, चाचण्या वाढविण्याची गरज : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   वैद्यकीय चाचण्या कमी झाल्याने रुग्णांचे प्रमाणही कमी दाखविले जात आहे. त्यातून पुणेकरांमध्ये कोरोना साथीचा धोका संपला असा समज निर्माण झाला आहे. अशा मानसिकतेतून साथीची कदाचित दुसरी लाट उद्भवण्याचा धोका आहे असा इशारा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असल्याचे चित्र दाखविले जात आहे. त्यातून लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले असून गर्दीच्या ठिकाणीही ते निर्धास्तपणे वावरु लागलेले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोरोना साथीची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. याकरिता कोरोना साथीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी चाचण्या वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सरकारच्या निदर्शनास मी वारंवार आणून दिले आहे आणि अजूनही माझे तेच मत आहे असे शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत घरोघर जाऊन कोरोनाच्या चाचण्या करणे अतिशय गरजेचे आहे. पुण्यातील कोरोना साथीचा धोका संपलेला नाही.

पुण्यातील कोरोना संसर्गाची टक्केवारी पाहिली तर बाधितांची संख्या तसेच मृत्यूदर कमी झालेला नाही.
चाचण्या कमी होत असूनही त्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १५ ते २० टक्के आढळत आहे. याचा अर्थ साथीचा धोका टळलेला नाही. जनतेला याचे गांभीर्य लक्षात आणून देणे आवश्यक आहे, असेही शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.