रेल्वेच्या मदतीनं होणार ‘कोरोना’चा ‘खात्मा’, ‘या’ 5 राज्यात उपचारासाठी दाखल झाले 960 ‘कोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित उपाययोजनांची घोषणा केल्यानंतर रेल्वेने दिल्लीतील नऊ स्थानकांवर 503 आयसोलेशन कोच उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर पाच राज्यात असे 960 कोच बसविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी या कोच ची खास रचना केली गेली आहे. दिल्लीच्या आनंद विहार स्थानकात सर्वाधिक 267 कोच लावण्यात आले आहेत. शकूर बस्ती आणि सराय रोहिल्ला स्थानकात 50-50 कोच लावण्यात आले आहेत.

त्याशिवाय दिल्ली कॅंट स्टेशनवर 33, आदर्श नगर स्टेशनवर 30, सफदरजंग स्टेशनवर 21, पटेल नगर येथे 26 आणि तुगलकाबाद स्थानकात 13-13 आयसोलेशन कोच बसविण्यात आले आहेत. देशात महाराष्ट्रानंतर दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. राजधानीत संक्रमणाची प्रकरणे 44 हजाराहून अधिक झाली आहेत, त्यापैकी 1837 लोक मरण पावले आहेत. वाढत्या प्रकरणांदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी अनेक उपाययोजनांची घोषणा केली होती, ज्यात रेल्वेला 500 कोच उपलब्ध करुन देण्याबाबत सांगितले होते.

अधिकारी म्हणाले, दिल्लीशिवाय उत्तर प्रदेशात 372, तेलंगणमध्ये 60, आंध्र प्रदेशात 20 आणि मध्य प्रदेशात पाच आयसोलेशन कोच उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील झाशी स्थानकात रेल्वे वर्कशॉपमध्ये 52, लखनऊमध्ये 37, मऊ व भटनीमध्ये 24-24, कानपूरमध्ये 22, आग्रामध्ये 20 आणि झाशीमध्ये 15 कोच बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय वाराणसी शहर, बरेली, फर्रुखाबाद, कासगंज, गोंडा, नाखा जंगल, नौतनवा, बहराईच आणि मंडुआडीह येथे 12-12 कोच बसविण्यात आले आहेत. त्याचवेळी दीन दयाल उपाध्याय जंक्शन, वाराणसी, भदोही, फैजाबाद, सहारनपूर, मिरजापूर आणि सुभेदारगंज येथे 10-10 कोच बसविण्यात आले आहेत.