…म्हणून IIT मद्रास तात्पुरते बंद

पोलीसनामा ऑनलाईन : चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (Indian Institute of Technology ) 100 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात बहुतांश विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. कोरोनोच्या वाढत्या प्रसारामुळे संस्था तूर्त बंद केल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 104 विद्यार्थ्यांना बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्वाची प्रकृती सुधारत आहे, असे तमिळनाडूचे आरोग्य सचिव जे.राधाकृष्णन यांनी सांगितले.

आतापर्यंत 444 जणांचे नमुने घेतले असून 104 जण कोरोना बाधित निघाले आहेत. 1 ते 12 डिसेंबर दरम्यान संस्थेतील अनेकांचे नमुने घेण्यात आले, त्यानंतर सुरुवातीला रुग्णांची संख्या 33 होती ती आता 104 वर पोहचली आहे. मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्या आदेशानुसार या सर्वांना किंग्ज इन्स्टिटय़ूट येथे उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हटले आहे, की सर्व विभाग व प्रयोगशाळा बंद केल्या असून एकूण 700 संशोधक विद्यार्थ्यांनाच नऊ वसतिगृहात राहण्याची अनुमती दिली आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत.

राधाकृष्णन यांनी सांगितले, की एकूण रुग्णांच्या चाचण्या सकारात्मकतेचा दर 20 टक्के असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, कारण या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून सर्व नियमांचे पालन केले जात आहे.