Coronavirus : भारतात ‘कोरोना’बाधितांची संख्या 152 वर, 17 राज्यांमध्ये पसरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असून बुधवारी दिवसभरात ५ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे आता देशात कोरोना बाधितांची संख्या १५२वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून संपूर्ण देशात जमावबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असल्याने येथे सर्वाधिक खबरदारी घेतली जात आहे.
घनदाट लोकसंख्या असलेल्या मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा सर्वाधिक भिती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी जास्तीतजास्त काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व खासगी कंपन्यांना त्यांच्याकडील ५० टक्के कर्मचार्‍यांना कामावर येऊ देऊ नये. त्यांना वर्क फॉर्म होम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व सार्वजनिक समारंभ बंद करण्यात आले आहेत. राज्या राज्यांच्या सीमांवरील टोलनाक्यांवर आता तपासणी सुरु करण्यात आली आहे. कर्नाटकने आपल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून टोलनाक्यावरच येणार्‍या सर्व गाड्यांमधील लोकांची तपासणी सुरु केली आहे.

अलाहाबाद हायकोर्ट तीन दिवस बंद
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अलाहाबाद आणि लखनौ हायकोर्ट आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. या तीन दिवसात कोणत्याही खटल्याची सुनावणी होणार नाही. या तीन दिवसात साफसफाई आणि सॅनिटाझेशन करण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या सुट्टीच्या बदल्यात हायकोर्ट १ व २ जून आणि ४ एप्रिल रोजी काम करणार आहे.