पटियाला तुरुंगात 40 महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह , तर IIM अहमदाबादमध्ये 70 लोक संक्रमित

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशातील कोरोनाचा आलेख वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मध्ये आता 70 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेचे उप आरोग्य अधिकारी डॉ. मेहुल आचार्य यांनी याबाबत माहिती दिली.

त्याचवेळी, पटियालाच्या नाभा ओपन जेलमधील चाळीस महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. एकूण 47 कैद्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. आरोग्य विभागाने म्हटले की, महिला प्रभागातून रँडम नमुने गोळा करण्यात आले होते, यानंतर सकारात्मक चाचणी येणाऱ्या कैद्यांना राज्यातील कोविड-पॉझिटिव्ह लोकांसाठी असणाऱ्या तुरूंगात हलविण्यात येईल.

त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे, 56,211 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 1,20,95,855 पर्यंत वाढली आहे. यासह देशातील एकूण सक्रीय प्रकरणांची संख्या 5,40,720 आहे. तर 271 नवीन मृत्यूनंतर एकूण मृत्यूंची संख्या 1,62,114 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1,13,93,021 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रकरणा दरम्यान देशात लसीकरण मोहीमही मोठ्या स्तरावर सुरु आहे, देशात आतापर्यंत 6 कोटी (6,11,13,354) पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. तर या 24 तासांत 5,82,919 लोकांनी लस घेतली आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण सर्वाधिक असून 57,82,665 लोकांनी राज्यात लस घेतली आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार कालपर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या एकूण 24,26,50,025 सॅम्पल चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी काल 7,85,864 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की कोरोना रोखण्यासाठी चाचणीची भूमिका महत्त्वाची असून अधिकाधिक लोकांची चाचणी घ्यावी.

दरम्यान, काल दिल्लीत 1904 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर राजधानीतील रिकव्हरी रेट 2.77 आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी सांगितले की जनजागृती केली जात आहे आणि त्याला लाट म्हणायला आठवडा लागू शकेल. बेड्सचा आढावा घेतला जाईल. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा भयानक आहे. सोमवारी येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाची 31,643 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून राज्यात संक्रमित लोकांची संख्या 27,45,518 झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी देखील संसर्गाचे 40,414 नवीन रुग्ण आढळले.